गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर आला आहे. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लालबागचा राजाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. या वर्षीच्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे. राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो लोक रांगा लावतात. आता या वर्षाच्या राजाची पहिली झलक भक्तांना पाहायला मिळाली.
मुंबईतील लालबागच्या राजाच्या ओळख नवसाला पावणारा गणपती अशी आहे. मुंबई आणि मुंबईच्या बाहेरुन लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. गणपती बाप्पा मोरया, लालबागच्या राजाचा विजय असो असे म्हणत लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन त्याच्या भाविकांना मिळाले.
यावेळी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. प्रत्येकजण बाप्पाचे रुप पाहण्यासाठी आतुर झाले होते. पडदा बाजूला झाला आणि बाप्पाचे गोड रुप त्याच्या भाविकांना पाहता आले. यंदाचा लालबागचा राजा हा मयूरासनावर विराजमान झालेला आहे. गणपती बाप्पांचे लाईव्ह दर्शन सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भाविकांना घेतले.
लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी अनेक सेलिब्रिटी देखिल येत असतात. अनंत अंबानी यांची लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी मंडळात मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लालबागच्या राजा मंडळाचे यंदा 91 वे वर्ष आहे. लालबागच्या राजाने परिधान केलेला सोन्याचा मुकूट हा अंबानी कुटुंबाकडून देण्यात आला असून हा मुकूट 20 किलोचा असल्याची माहिती मिळत आहे.